अंगणवाडीतील साडेबारा हजार बालकांची आरोग्य तपासणी डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांची माहिती
अंगणवाडीतील साडेबारा हजार बालकांची आरोग्य तपासणी
डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांची माहिती
हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी तीन वर्षांच्या आतील अंगणवाडीतील सुमारे बारा हजार ७९९ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयात जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखाली विविध विभाग कोरोना विषाणू रोखण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला असून तोही निगेटिव्हच्या मार्गावर आहे. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग व प्रसार होऊ नये याची खबरदारी म्हणून बाहेर जिल्ह्यातील हिंगोलीत दाखल झालेल्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. गावात आलेल्या एखाद्या कोरोना संशयिताच्या संपर्कात लहान बालके येऊ नये याची खबरदारी म्हणून आता जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी ,जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगांवाड्यातील तीन वर्षांच्या आतील बालकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण विभागाला बुधवारी देण्यात आल्या होत्या .
त्यानुसार अंगणवाडीतील तीन वर्षांच्या आतील बालकांची काळजी म्हणून कोरोना पासून बचाव करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी राजकुमार धापसे ,नैना पाटील ,चव्हाण आदी अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका, मदतनीस कडून आरोग्य तपासणी करून घेतली जात आहे.
जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्या यामध्ये झिरो ते सहा वर्षे वयोगातील सुमारे एक लाखापेक्षा अधिक बालके आहेत. सहा महिने ते तीन वर्षाच्या आतील सुमारे ४७ हजार २५७ बालके असून त्यापैकी बारा हजार ७९९ बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून यातील साधारण खोकला ,ताप असलेल्या बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी पाठविले आहेत. आता उर्वरित बालकांची आरोग्य तपासणी देखील येत्या दोन दिवसात पूर्ण करणार असून त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर परिश्रम घेत असून अंगणवाड्या बंद असल्याने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. शिवाय पोषण आहार देखील घरपोच वाटप केला जात असल्याने गणेश वाघ यांनी सांगितले.