आखाडा बाळापूर येथे स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर - येथे शिधापत्रिकाधारकांना जादा दराने धान्य वाटप करणे तसेच शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप न करता मोघम स्वरुपात धान्य वाटप केल्याच्या आरोपावरून एका स्वस्त धान्य दुकानदारा विरुध्द जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१०) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोध सुरु केला आहे.
आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार ओमप्रकाश ठमके हे शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या नियमानुसार व योग्य दराने धान्य वाटप करीत नसल्याची तक्रार वंचीत बहुजन आघाडीचे राजू कांबळे, माणिक पंडीत यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे दुरध्वनीवरून केली होती. त्यावरून आज आज तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मंडळ अधिकारी आनंदराव सुळे यांनी दुकानास भेट देऊन चौकशी केली. यावेळी चौकशीमध्ये दुकानदाराच्या अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये यामध्ये ई पॉस मशीनमधून काढलेल्या अनेक पावत्या दुकानातच फेकून दिल्या होत्या तर दुकानातील रजिष्टरवर केवळ लाभार्थ्यांचीच नांवे लिहीण्यात आली होती. त्यांना नेमके किती धान्य वाटप झाले याचा उल्लेख या रजिष्टरवर नव्हता. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच त्यांनी धान्य साठा करणे सुरु केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य जादा दराने वाटप केले जात असल्याचेही काही शिधापत्रिकाधारकांनी सांगितले.
त्यावरून मंडळ अधिकारी अनंतराव सुळे यांनी आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आखाडा बाळापूर पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदार ओमप्रकाश ठमके याच्या विरुध्द जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.