पीबीएन शॉप अॅपद्वारे मिळणार घरपोच किराणा
पीबीएन शॉप अॅपद्वारे मिळणार घरपोच किराणा
कॅश ऑन डिलेव्हरीची सोय,स्वयंसेवक करणार घरपोच वितरण
परभणी,दि.08(प्रतिनिधी)ः किराणा साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांवर लॉकडाऊनच्या काळातही होत असलेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने पीबीएन शॉप हे अॅप विकसीत केले असून नागरिकांना या अॅपद्वारे घर बसल्या ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. सामान घरी मिळाल्यानंतरच रक्कम देण्याची सोयही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी नागरिकांची जीवनाश्यक किराणा मालाची गरज लक्षात घेवून अॅप विकसीत करण्याबाबतची संकल्पना मांडली होती. त्यातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ही सेवा निर्माण करण्याचे ठरले. मोबाईल अॅप व संगणक प्रणालीची निर्मिती मॅप ऑन कंपनीचे सीईओं सचिन बाळासाहेब देशमुख यांच्या वतीने विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसीचे अधिकारी सुनिल पोटेकर यांनी या संगणक प्रणालीचा विकास केला आहे. यासाठी त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती धुळे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विवेक पाटील यांचे सहकार्य लाभले.
सोमवार(दि.सहा) ही प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून गुगल प्ले स्टोअर वर हे अॅप विनामुल्य उपलब्ध आहे. अॅन्ड्राईड फोनधारक हे अॅप वापरू शकतील. संगणकावर देखील ही प्रणाली वापरता येणार आहे.
नागरिकांनीही किराणा मालाची ऑर्डर दिल्यानंतर 24 तासाच्या आत घरपोच सेवा देण्यात येणार आहे. यासाठी ऑर्डर देतांना नागरिकांनी त्याचा मोबाईल क्रमांक व संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमुद करावयाचा आहे. ऑर्डर केलेल्या सामानाची किराणा दुकानादाराकडून पावती मिळणार आहे. घरपोच डिलेव्हरी करणारे स्वयंसेवक ही पावती नागरिकांना दाखवतील. त्याप्रमाणे रक्कम द्यावयाची आहे. त्यामुळे घर बसल्या ऑर्डर करून कॅश ऑन डिलेव्हरीची सोय झाली आहे. नागरिकांनी किराणा साहित्याच्या निमित्ताने घराबाहेर पडू नये,यासाठी प्रशासनाने हा आगळावेगळा प्रयत्न केला आहे.