अंगणवाडी सेविका, आशा वर्करकडून डोअर टू डोअर सर्व्हेक्षण
अंगणवाडी सेविका, आशा वर्करकडून डोअर टू डोअर सर्व्हेक्षण
कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची केली जाते जनजागृती
हिंगोली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अंगणवाडी सेविका सह आशा वर्कर ही मैदानात उतरल्या असून जिल्ह्यातील गावात डोअर टू डोअर जाऊन बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून सर्व्हेक्षण देखील केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांनी दिली आहे.
भारतात गेली दहा दिवसापासून कोरोना नावाच्या विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. हा संसर्ग इतर राज्यात पसरवू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने रविवारी( ता.२२) जनता कर्फ्युचे नागरिकांना आवाहन केले होते त्यानुसार सर्वत्र जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील खबरदारी म्हणून खाजगी बसेस, सरकारी बसेस, रेल्वे गाडया बंद करण्यात आल्या त्यामुळे बाहेर राज्यातील, येणाऱ्या नागरिकांचे दरवाजे बंद करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी , यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून राज्य सरकारच्या आदेशानुसार गर्दीच्या ठिकाणी हा संसर्ग पसरवू नये, यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना३१मार्च पर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या. तसेच शासकीय कार्यालयातील गर्दी कमी केली. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद केली, ग्रामीण भागातील आठवडे बाजारावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून केवळ दहा रुग्ण आले असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने देखील कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न चालविले आहेत, त्यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची नोंद घेतली जात आहे. जिल्ह्यात सात ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त केले आहेत. जमावबंदी, संचार बंदी काळात नागरिक घराबाहेर पडू नये यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे .याशिवाय कोरोना विषाणूची साम्य लक्षणे दिसून आल्यास अश्याना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार केले जाणार आहेत. तसेच ४०० बेडची व्यवस्था इतर ठिकाणी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे सीईओ आर. बी. शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा श्याल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास, महिला बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांनी जिल्ह्यातील १०८९ अंगणवाड्या अंतर्गत येणाऱ्या गावात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जीव धोक्यात घालून गावात डोअर टू डोअर जाऊन बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करून सर्व्हेक्षण करीत आहेत.तसेच कोरोना बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. नागरिकही मदत करीत आहेत. कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे दिसून आल्यास त्यांची नोंद करून त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जाणार आहेत. या सर्व्हेक्षणातून कोरोना सदृश्य रुग्णांची आकडेवारी समोर येऊ शकते. मात्र आतापर्यन्त जिल्ह्यात एकही कोरोनाशी साम्य लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे नागरिकांना कुठे ही बाहेर पडता येत नाही. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यास पोलिसांकडून काठ्याचा प्रसाद मिळत आहे. बाजारपेठेत शुकशुकाट असून रस्ते ही ओस पडल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी स्वतःच घायवायची आहे. आता तर (ता.१४) एप्रिल पर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा ही एक दिवसाआड सुरु राहणार आहे. कोरोनावर खबरदारी म्हणून या उपाय योजना केल्या जात आहेत. आता तर आरोग्य विभागाच्या पथका सोबत अंगणवाडी सेविका ही कोरोना विषाणू ला प्रतिबंध घालन्यासाठी डोअर टू डोअर जाऊन जनजागृती करीत असल्याचे गणेश वाघ यांनी सांगितले.