आ.रत्नाकर गुट्टेंना मिळाला जामिन
रासपचे आ.रत्नाकर गुट्टेंना मिळाला जामिन
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, शेतक-यांच्या नावे कोट्यावधीचे कर्ज प्रकरण
गंगाखेड,दि.06(प्रतिनिधी)ः शेतक-यांच्या नावाने परस्पर कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलल्या प्रकरणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या गंगाखेड शुगर्सचे सर्वोसर्वा व रासपचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना गुरूवारी (दि.पाच) सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला.
तब्बल 346 दिवस कारागृहात राहिलेले व कारागृहातूनच 2019 ची विधानसभा निवडणुक लढवून विजयी ठरलेलेे डॉ.गुट्टे यांना न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
गंगाखेड शुगर्सच्या कर्जप्रकरणात 26 मार्च 2019 रोजी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबादच्या सीआयडी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहातच होते. तेथूनच गुट्टे यांनी अटकपुर्व जामिन मिळावा म्हणून औरंगाबाद खंडपीठात वारंवार अर्ज केला. परंतू न्यायालयाने गुट्टे यांचा जामिन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळेच गुट्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गंगाखेड शुगर्सने 29 हजार शेतक-यांच्या नावाने सहा बँकांकडून 328 कोटी रुपयांचे पीककर्ज उचललेले होते. कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिका-यांनी संगनमत करून ज्या शेतक-यांनी काराखान्याचे शेअर्स घेतले होते व ऊस पुरवला होता. अशा शेतक-यांच्या नावे कर्ज उचलेले होते. यात परभणीसह बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या चार जिल्ह्यातील शेतक-यांचा समावेश होता. बँकांनी थकबाकी बाबत शेतक-यांना नोटिस पाठविल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यावरून गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षानंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात झाली. 28 फेब्रुवारी 2019 रोजी कारखान्याच्या तीन प्रमुख अधिका-यांनी सीआयडीने अटक केली होती. त्यानंतर 26 मार्च रोजी श्री गुट्टे यांनाही सीआयडीने अटक करून गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. त्यांच्यावर दोषारोपपत्र ही दाखल झाले. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. या दरम्यान, परभणी कारागृहात ते होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातूनही जामिन न मिळाल्याने श्री गुट्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. गुरूवारी त्यांना न्यायालायाने जामिन मंजूर केला.
गुट्टे समर्थकांचा गंगाखेडमध्ये जल्लोष
आ.रत्नाकर गुट्टे यांना जामिन मंजूर झाल्याचे समजताच गुट्टे मित्रमंडळ व रासपच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड शहरात फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. मतदारसंघातील रखडलेली विकास कामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.