कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू


             हिंगोली,दि.13: आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचे संशयीत रुग्ण हिंगोली शहरात आढळून येण्याची शक्यता असून यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर तात्काळ सनियंत्रण करुन संसर्गात वाढ होऊ नये तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांची तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.


या कायद्यातंर्गत औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री केल्यास, औषधांची साठेबाजी करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच चुकीचे समज किंवा अफवा पसरविणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे देखील आदेश सनियंत्रक यांना दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेवून त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघु कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये, यासाठी उपाययोजना आखणे, आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे पालन करणे स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवणे, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेशात नमूद केले आहे.


स्वतंत्र माहिती व मदत कक्षाची स्थापना


कोरोना विषाणूचा संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना केली आहे. टोल फ्री क्रमांक 104 कार्यान्वीत करण्यात आला आहे. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे या जबाबदाऱ्यादेखील सनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा