हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
हिंगोली - हिंगोली सह परिसरात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱयांच्या हाता तोंडाशी आलेला गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसऱ्या बाजूने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या द्विधा मनस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे.मागील नुकसानीचे अनुदान मिळते न मिळतेच तोच पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यावर आले आहे. शनिवारी देखील अर्धा तास पडलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कर्फ्यु लागू केला आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेतातील काढणीस आलेले पिके काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाहीत, शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.