हिंगोलीत सापडला प्रथमच विषारी दुर्मिळ साप
हिंगोलीत सापडला प्रथमच विषारी दुर्मिळ साप
सर्पमित्राकडून त्या दुर्मिळ पोवळा सापास जीवनदान
हिंगोली - शहरातील हरण चौक या ठिकाणी अतिविषारी दुर्मिळ पोवळा साप सर्पमित्रांनी शनिवारी सायंकाळी पकडून त्यास जीवनदान दिले आहे.
शहरातील हरण चौक परिसरात साप निघाल्याची माहिती मिळताच सर्प मित्र विजय पाटील यास काही नागरिकांनी दिली. त्यावरून विजय पाटील यांनी तातडीने आपल्या सर्पमित्राना सोबत घेऊन आला. त्यांनी या सापाला पाहता क्षणीच हा पोवळा साप असून अति विषारी असून तो दुर्मिळ असल्याचे सांगितले. हिंगोलीत हा साप पहिल्यांदाच आढळून आला आहे.काही वेळाने त्या सापाला मोठ्या शिताफीने पकडले.
हा साप दीड फूट लांब असून, तपकिरी रंगाचा आहे, त्याच्या शेपटी कडील भागावर काळ्या रंगाचे ठिपके आहेत, तर तोंडाकडील भाग सुद्धा काळपट असल्याचे दिसून आले. या सापाला इंग्रजी मध्ये स्लेनडर कोरल स्नेक असे म्हटले जाते. सर्पमित्र विजय पाटील यांनी वर्षभरात हजारो साप पकडले आहेत यामध्ये कोब्रा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस या विषारी सापासह बिनविषारी साप पकडून त्यांना जीवन दान देण्याचे काम केले आहे. एकीकडे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे अशी म्हण आहे. साप हा शेतातील धान्याचे नुकसान करणाऱ्या उंदीर, घुस यांचा नायनाट करतो. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून खरच साप मदत करतो. मात्र शेतकरी घाबरून त्या सापाला मारतो. परंतु शेतकऱ्यांनी ,नागरिकांनी साप दिसल्यास त्यास मारू नका,असे आवाहन ही सर्पमित्र पाटील यांनी केले आहे.