शिरडशहापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू
शिरडशहापूर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू
औंढा नागनाथ - तालुक्यातील शिरडशहापूर येथे एका युवकाला हिटरचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता.९) सकाळी घडली.
या बाबत माहिती अशी की, शिरडशहापूर येथील अकरावी वर्गात शिकणारा जय ज्योती जाधव ( १६) सकाळी सात वाजता अंघोळीसाठी गरम पाणी घेत असताना त्याचा इलेक्ट्रीक हिटरचा शॉक लागला. लगेच घरच्यांनी त्याला
उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यास मृत घोषित केले. जय हा मुलगा शिक्षणात फार हुशार होता पाचवी ते दहावी पर्यंत तो भावना पब्लिक स्कूल रिसोड येथे शिकत होता. त्यानंतर तो पुढील शिक्षण राजस्थानमध्ये कोटा येथे शिक्षण घेत होता. त्याचे स्वप्न आयएसआय अधिकारी बनण्याचे होते. तो सुट्ट्या असल्यामुळे घरी आला होता.
तसेच तो घरच्यांना एकुलता एक होता ऐन होळीच्या सणाच्या दिवशी युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरील घटनेचा पंचनामा जमादार प्रकाश नेव्हल यांनी केला व शवविच्छेदन वसमत उपजिल्हा रुग्णालय येथे केले. या बाबत कुरुंदा पोलिस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर शिरडशहापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.