अरीबम शर्मा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ
अरीबम शर्मा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ
हिंगोली - राज्य शासनाने राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले असून त्यात हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नवे आयएएस अधिकारी म्हणून अरीबम शर्मा यांची रिक्त पदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, येथील जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डॉ. एच. पी. तुमोड यांची औरंगाबाद येथे आठ दिवसांपूर्वी बदली झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविला आहे. त्यामुळे कामे मार्गी लागत आहेत. आता मार्च एन्ड असल्याने त्यातच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ही सादर करणे बाकी आहे.बुधवारी (ता.११) राज्य शासनाने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यापैकी मुंबई येथील ग्रामविकास मंत्रालयातील २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अरीबम शर्मा यांची नियुक्ती हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी नियुक्ती केल्याने आता जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ अधिकारी मिळाला आहे. मात्र ते कधी रुजू होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत मात्र बुधवारी जिल्हा परिषदेत पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्यात नवे अधिकाऱ्यावरून चर्चा झडत होत्या.