सोनपेठात रोटरी क्लबकडून पोलीसांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था
राहूट्यामध्ये राहणार्या गरजूंना केले तांदूळाचे वाटप
सोनपेठ,दि.28(प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे हॉटेल्स व दुकाने बंद आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी पोलीसांची गस्त सुरु आहे. सोनपेठ शहरासह तालुक्यात गस्तीवर असणार्या अशा पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना रोटरी क्लबच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे, यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बद आहेत. सोनपेठ येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत भाजीपाला विक्री होत आहे. त्यानंतर बंद करण्यात येत आहे. नागरीकांनी गर्दी करु नये, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरासह तालुक्यात गस्त घालत आहेत.
गस्तीवर असणार्या या अधिकारी व कर्मचार्यांना पिण्याचे पाणी व चहा मिळावा यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. सोनपेठ येथील मोबाईल हॉटेल चालक राजेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कापड व्यापारी ज्ञानेश्वर डमढेरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना मास्कचे वाटप केले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने सोनपेठ परिसरात राहूट्यामध्ये राहणार्या गरजू कुटूंबियांना तांदूळाचे वाटप केले आहे.