शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबाना धान्य वाटप कराव
शिधापत्रिका नसलेल्या गरीब
कुटुंबाना धान्य वाटप कराव
नगरसेवक रजवी यांची पालकमंत्री गायकवाड यांच्याकडे मागणी
कळमनुरी - कोरोना साथरोगाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र
लॉकडाऊन केल्याने अनेक गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने ज्या गरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही अश्या कुटुंबाना तातडीने रास्त भाव दुकानातून धान्य वाटप करावे अशी मागणी नगरसेवक नाजीम रजवी यांनी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली आहे.
कळमनुरी तालुका मागासलेला म्हणून ओळख आहे. या तालुक्यात मोठे औद्योगिक कारखाने नसल्याने अनेक गोरगरीब कुटुंबाना कामासाठी रोजमजुरी करून उदरनिर्वाह करावे लागत असे. मात्र कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार उडाल्याने जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय बंद केल्याने रोजनदारी करून काम करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हाताला कामच नसेल तर त्यांच्या घरात चुली कश्या पेटणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोर गरीब कुटुंबाचे हातावर पोट असल्याने अश्या कुटुंबाना धान्य वाटप करावे अशी मागणी केली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना, याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार दिवसांपासून जमावबंदी संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत . आता तर शासनाने २१ दिवस लॉकडाऊन केले आहे. कोरोना ग्रस्तांना किंवा बाहेर राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्ह्याच्या सीमा देखील बंद केल्या आहेत.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूरदार वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक गोरगरीब कुटुंबाकडे राशन कार्ड नाहीत. यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून राशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना धान्य वाटप करावे अशी मागणी नगरसेवक नाजीम रजवी यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.