संचारबंदीत चार दिवसात २५० गरजुना मोफत जेवण
हिंगोलीत गायत्री परिवार व विघ्नहर्ता ग्रुपचा पुढाकार
-----------
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना गायत्री परिवार व विघ्नहर्ता ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी चार दिवसापासून त्यांच्या भोजनाची मोफत व्यवस्था केली असून चार दिवसात 250 पेक्षा अधिक गरजुना भोजन दिले आहे.
जिल्ह्यात रविवारपासून (ता.22) जमावबंदी व संचारबंदी कायद्या लागू झाला आहे. कोरानाच्या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरीकांना घराबाहेर फिरणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण मागच्या काही दिवसापासून उपचार घेत आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे नातेनाईक देखील आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.
परंतू शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात शिवभोजनामार्फत दररोज दोनशे थाळीचे वाटप होत आहे. मात्र खाजगी रुग्णालयात अशी व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही गरज ओळखून शहरातील गायत्री परिवार ट्रस्ट व विघ्नहर्ता ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी यावर चर्चा करून या रुग्णाची भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून (ता. 22) ते बुधवारपर्यत (ता.25) खाजगी रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक असे 250 पेक्षा अधिक जणांना सकाळ व सायंकाळी दोन वेळेस मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच जालना येथून एक कुटुंब पायंदळ आले असता त्या कुटुंबाना ही भोजन दिले.
शहरातील कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण आहेत याची माहिती घेत व त्यापैकी गरजुना त्यांच्या बेडवर डब्बा पुरविला जात आहेत. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेंवाईकातून संचारबंदीच्या काळात दिलासा मिळाल्याने समाधान मानले जात आहे. तसेच संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसह, जिल्हा सामान्य रुग्णांलयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी देखील चहा व शरबतची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक येथे आडकुन पडलेल्या काही नागरिकांना देखील डब्याची व्यवस्था केली जात आहे. बंदच्या काळात गायत्री परिवार व विघ्नहर्ता ग्रुपतर्फे केल्या जात असलेल्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.