विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील पिंपळदरी येथील प्रकार
विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील
पिंपळदरी येथील प्रकार
विजजोडणी नसतानाही ९० ग्रामस्थाना आले वीजबील
पिंपळदरी येथील प्रकार
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे सौभाग्य योजने अंतर्गत भिंतीवर मिटर बसवून जोडणी न देताच ९० ग्राहकांना हजारो रुपयांची देयके माथी मारण्यात आली असून त्यांना थकबाकीदार दाखवत गावाचा आठ दिवसापासून विज पुरवठा बंद केल्याने अनेक अडचणी येत आहेत. सध्या बारावीच्या परिक्षेला सुरुवात झाल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
पिंपळदरी येथे शासनाच्या सौभाग्य योजने अंतर्गत ९० ग्राममस्थांच्या घरी भिंतीवर मिटर बसविण्यात आले आहेत. मात्र या ग्राहकांना विज वितरण कंपनीने विज जोडणी मात्र दिली नाही. आता मिटर बसले विज देखील सुरू होईल अशी अपेक्षा करून हे ग्रामस्थ घरात विजेचा प्रकाश कधी होईल याची वाट पाहत होते. त्याला बराच कालावधी देखील झाला त्यांनी संबधीताकडे अनेक वेळस या बाबत चौकशी केली आज उद्या बसेल असे सांगत वेळ मारून नेण्यात येत होती.
दरम्यान, विज वितरण कंपनीने सौभाग्य योजनेत मिटर बविलेल्या ९० नागरीकांना विज जोडणी न देताच त्यांना हजारो रुपयाची देयके दिली आहेत. यात शेख फारूक, शेख जिलानी, शेख महेबुब आदीचा समावेश आहे. या प्रकाराने हे ग्रामस्थ विजबील पाहून चक्रावुन गेले आहेत. आपल्या घरात विजेचा प्रकाशही पडला नाही मात्र बिल पाहून डोक्यात प्रकाश पडल्याचे ते सांगत आहेत. तसेच विज वितरण कंपनीने या ग्राहकांना जोडणी न देताच थकबाकीदार दाखवून आठ दिवसापासून संपुर्ण गावचा विज पुरवठा बंद केला आहे.
यामुळे ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत .तसेच सध्या बारावी परीक्षेच्या कालावधी असल्याने ऐन परिक्षेत विज पुरवठा खंडीत झाल्याने विद्यार्थ्याच्या अभ्यासवर त्याचा परिणाम होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठांनी दखल घेवून या प्रकाराची चौकशी करावी व बंद केलेला विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.