खर्चाला फाटा देत भागवत सप्ताहात विवाह सोहळा
वसमत - तालुक्यातील जोडपरळी येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात खर्चाला फाटा देत गुरूवारी परळी येथील शोभा व तपोवन येथील मुंजाजी हे दोघे विवाहबध्द झाले आहेत.
जोडपरळी येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात खर्चाला फाटा देत विवाह सोहळा हजारो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला. जोड परळी येथील बालासाहेब दशरथे यांची मुलगी शोभा हीचा विवाह तपोवन येथील रमेशराव कदम यांचा मुलगा मुंजाजी यांचे सोबत ठरला होता. गावात सुरू असलेल्या सप्ताहातील मंडळीने हा विवाह सप्ताहात करावा अशी कल्पना वधु पिता बालासाहेब दशरथे यांनी दिली. त्यांनी ही माहिती कुटूंबीयाना मुलगी शोभा हिला देखील सांगितली.
त्यानंतर वर व वराचे वडील यांना याची कल्पना देण्यात आली. त्यांच्या होकारानंतर हा विवाह ठरला त्याप्रमाणे गुरूवारी येथील पंचलिग महादेव मंदिरात सुरू असलेंल्या भागवत सप्ताहात शोभा व मुंजाजी खर्चाला फाटा देत विवाह बध्द झाले आहेत. यावेळी राजेश्वर महाराज काळे व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठया थाटात संपन्न झाला. या कार्यामुळे शेतकरी कुंटुबात समाधान व्यक्त होत असल्याचे राजेश्वर महाराज काळे यांनी सांगीतले. दरम्यान राजेश्वर महाराज काळे यांनी आज पर्यंत भागवत सप्ताहामध्ये दहा वर्षात १०० लग्न मोफत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.