आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून साकारली मराठवाड्यातील पहिली रेशीम परिषद
रेशीम उद्योगाचे केंद्र म्हणून औसा देशात ओळखले जावे-आ. पवार
औसा /प्रतिनिधी :लातूर जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे . उसाला अधिक पाणी लागते .त्याऐवजी रेशीम शेती केली तर कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळू शकते . आपण औसा परिसरात रेशीम लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे . भविष्यात औसा हे रेशीम उद्योगचे केंद्र म्हणून देशात ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करित लवकरच लातूर जिल्हा रेशीम उत्पादक संघाची स्थापना करणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले .
आ.पवार यांच्या संकल्पनेतून औसा येथे मराठवाड्यातील पहिली रेशीम परिषद संपन्न झाली . या परिषदेत आ.पवार बोलत होते . या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रेशीम विभागाचे औरंगाबाद विभागाचे उपसंचालक डी ए हाके , रेशीम तज्ञ डॉ.एल बी कलंत्री , अधिकराव जाधव , चॉकी तज्ञ विजय पाटील यांच्यासह तहसीलदार सौ.पुजारी , तालुका कृषी अधिकारी मोरे , निलंगा तालुका कृषी अधिकारी नांदे , रेशीम अधिकारी शिंदे , जिल्हा रेशीम अधिकारी बावगे , मांजरा कृषिव विज्ञान केंद्राचे देशमुख , येथील बालाजी पवार , शिवाजीराव भोसले , भीमाशंकर राचट्टे,अरविंद कुलकर्णी , सुशीलदादा बाजपाई , सुभाष जाधव , संतोष मुक्ता , दीपक चाबुकस्वार , महेश पाटील , नवनाथ मस्के , बाबासाहेब पाटील , कल्पनाताई डांगे , बालाजी शिंदे , बालाजी हाके , शिवहार मुळे , कमलेश पटेल आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.पवार म्हणाले की ,गेल्या दोन महिन्यांपासून काही तरी वेगळं करावं असा विचार सुरू होता.पाणी पातळी खालावली ही चिंतेची बाब आहे. लातूर जिल्ह्य़ातील परिस्थिती वाळवंटाकडे जात आहे .यामुळे पाणीसाठे निर्माण करणे काळाची गरज आहे .जलयुक्त शिवार अभियान कामामुळे पाणीपातळी वाढली आहे .शेतकऱ्यांनी ऊसापेक्षा इतर पर्याय निर्माण केले पाहिजेत.रेशीम उद्योगाला पाणी कमी लागते .शेतकऱ्यांनी याकडे वळले पाहिजे .कोणत्याही पिकापेक्षा रेशीम उद्योग हा चांगला पर्याय आहे .
येणार्या पाच वर्षांत ७ हजार शेतकरी रेशीम उद्योगात असतील. येणाऱ्या काळात आपणास रेशीम उद्योगाकडे वळायचे आहे .रेशीम पुर्णपणे जैविक व परिपूर्ण पीक आहे.शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगात यावे . व्यवसाय म्हणून या रेशीम लागवडीकडे वळावे .रेशीम उद्योगात शेतकऱ्यांसह देशहित आहे,असेही ते म्हणाले .
एक शाश्वत पीक म्हणून रेशीम उद्योगाकडे बघा असे सांगत ते म्हणाले की ,दिलीपराव देशमुख यांच्याकडे जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला मदत करण्याची मागणी मी केली. यावर त्यांनी पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा शब्द दिला आहे . याबद्दल दिलीपराव देशमुख यांचे मी आभार मानतो. असे आ. अभिमन्यू पवार यावेळी म्हणाले.
उत्पन्नाच्या उद्देशाने रेशीम उद्योगाकडे वळा- कलंत्री
रेशीम उद्योगाला कष्टाचे भांडवल लागते .ही काळी आई कोणालाही उपाशी ठेवत नाही. रेशीम शेती हे विज्ञान आहे .रेशीम शेती समजून करा .लागवड, संगोपन करताना काळजी घ्या .रेशीम उद्योगात शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचे आहे .ग्रामीण अर्थ व्यवस्था बदलण्याची ताकद रेशीम लागवडीत आहे .रेशीमच्या कपड्यांना मोठी मागणी आहे. औसा सिल्क ही औशाची ओळख या उद्योगातून निर्माण करावयाची आहे .तुम्ही रेशीमची काळजी घ्या रेशीम तुमची काळजी घेईल असेही कलंत्री म्हणाले .
रेशीम पासून बनवलेला हार घालून आ. अभिमन्यू पवार यांचे यावेळी स्वागत करण्यात आले . या परिषदेस औसा तालुका व मतदारसंघातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती