चालू वर्षात चार शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

चालू वर्षात चार शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा


शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच

 

विलास जोशी

-------------------

हिंगोली - मागील वर्षात ४१ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपविली होती. चालू वर्षात देखील हे सत्र सुरूच असून १८ फेब्रुवारी अखेर दोन महिन्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे आकडेवारी वरून स्पस्ट होते.

 

जिल्ह्यात गत वर्षात ४१ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी घेतली असून यातील ३७ पात्र शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनाने आर्थिक मदत दिली असतानाच, चालू वर्षात देखील आत्महत्येचे सत्र संपवण्याऐवजी सुरूच आहे.जिल्ह्यात गत वर्षी ऑक्टोबर ,नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी ,आणि बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. खरीप हंगाम हाता तोंडाशी आला असताना पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच कापूस, सोयाबीनला भाव ही चांगला मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. तसेच रब्बी हंगामात देखील अस्मानी संकट शेतकऱ्यावर ओढावले होते.खाजगी सावकारी व्यापाऱ्यांकडून घेतलेले कर्ज, मुलीचे शिक्षण,लग्न कसे करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

 

चालू वर्षात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये हिंगोली तालुका वगळता सेनगाव तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यात एक प्रकरण पात्र ठरले, तर एक प्रकरण चौकशी साठी ठेवण्यात आले आहे. एका कुटूंबियास शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. याचप्रमाणे कळमनुरी तालुक्यात एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. एक प्रकरण पात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच वसमत तालुक्यात एकाने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सत्यता तपासून पाहिली असता हे प्रकरण पात्र ठरल्याने त्यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत देण्यात आली. सेनगाव तालुक्यातील भागवत नारायण निर्मल

 राहणार पुसेगाव यांनी अकरा फेब्रुवारी दरम्यान आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणाची चौकशी सेनगाव तहसिल प्रशासनाकडे प्रलंबित असल्याने त्यांच्या कुटूंबियास आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यातील तीन प्रकरणे पात्र ठरली तर एक प्रकरण चौकशी साठी प्रलंबित पडले असून, केवळ तीन शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे.

 

मागील सरत्या वर्षात हिंगोली तालुक्यात चार शेतकऱ्यांनी नापिकीला, कर्जाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. यातील चारही शेतकरी पात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर सेनगाव मध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती यातील तिन्ही शेतकरी पात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली, कळमनुरी मध्ये दोन पैकी दोन्ही शेतकरी पात्र ठरल्याने, आर्थिक मदत मिळाली.सर्वाधिक  वसमत मध्ये २६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. यापैकी २३पात्र तर तीन अपात्र ठरले, औंढा नागनाथ तालुक्यात एकूण सहा शेतकऱ्यांपैकी पाच शेतकरी शासनाच्या निकषात पात्र ठरले तर एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मागील वर्षात ४१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते.यापैकी ३७ पात्र, तीन अपात्र तर एकाची चौकशी सुरू आहे. यातील ३७ आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यातुलनेत २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी कर्ज बाजारी पणाला कंटाळला होता. बियाणे, सावकारी कर्ज कसे फेडावे या विवनचनेत सापडला होता. यामुळे ६४ शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. यातील ४१ प्रकरणे अपात्र ठरल्याने केवळ २३ पात्र शेतकरी आत्महत्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.२०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये ४१ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. गत वर्षी आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारी वरून दिसून येते.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा