तर 35 हजार नळधारकांचे 10 कोटी वाचू शकतात
तर 35 हजार नळधारकांचे 10 कोटी वाचू शकतात
नव्या नळ जोडणीत सरसकट दर नको, सचिन देशमुख यांची मागणी
परभणी,दि.11(प्रतिनिधी)ः शहराच्या नव्या पाणीपुऱवठा योजनेत जोडणी घेतांना अनामत रक्कमे व्यतिरिक्त सरसकट 9 हजार रुपये दर महापालिकेने आकारल्यामुळे गरज नसतांनाही सर्वांना ते लागू पडणार आहेत. यामुळे 35 हजार नळधारकांचे तब्बल 10 कोटी 50 लाख रुपये जास्तीचे जाणार आहेत. गरजेच्या साहित्याप्रमाणे दर आकारणी केल्यास हे पैसे वाचू शकतात, असा दावा नगरसेवक सचिन देशमुख, प्रसाद नागरे यांनी केला आहे.
महापालिकेने नव्या नळ जोडण्या देताना अनामत रक्कम 2 हजार रुपये व जोडणीचे काम करण्यासाठी एजन्सीला 9 हजार रुपये प्रति जोडणी देण्याचे निश्चीत केले आहे. यात एजन्सीने 15 मिटर पाईप, नळजोडणीसाठी लागणारे सर्व साहित्य, खोदकाम व कनेक्शन दिल्यानंतर मिटर बसविणे आदी कामे केली जाणार आहेत. या शिवाय ही जास्तीचा लागणारा खर्च नागरिकांकडूनच वसुल केला जाणार आहे. सध्या 27 हजार नळधारक आहेत. नव्याने नळ घेणा-यांची संख्या ही मोठी आहे. परंतू त्यांना हे दर परवडणारे नाहीत.
रस्त्याच्या एका बाजुला असणा-या नळधारकांना 10 फुट पाईप( 3 मिटर) लागणार असून त्यासाठी केवळ 540 रुपये लागणार आहेत. तरी देखील एजन्सीला 15 मिटर पाईपचे पैसे म्हणजेच 2 हजार 700 रुपये द्यावे लागणार आहेत. यमुळे गरज नसतांना 12 मिटर पाईपचे 2 हजार रुपये जास्तीचा भुर्दंड पडणार आहे. त्याच बरोबर रस्त्याच्या एका बाजूस असलेल्या नागरिकांना खोदकाम करण्याचे व कॉक्रीटीकरण करण्याची गरजच भासणार नाही. तरी या कामास अंदाजे 2 ते 3 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी नवीन रस्ते झालेले असून त्या ठिकाणी यापुर्वीच पाईप टाकून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तेथेही खोदकाम व कॉक्रीटीकरणाची गरज पडणार नसतांना या कामाचे पैसे मात्र एजन्सीस द्यावे लागणार आहे. याचा निष्कारण भुर्दंड नागरिकांवर पडणार आहे.
या तिन्ही बाबी पाहता 30 ते 35 हजार नळधारकांना पाईप, जोडणी, दुरूस्तीची गरज नसतांना अंदाजे 3 हजार रुपये एजन्सीस द्यावे लागणार आहे. त्यामुळे अशा 35 हजार नळधारकांचे प्रत्येकी तीन हजार रुपये या प्रमाणे 10 कोटी 35 लाख रुपये विनाकारण एजन्सीच्या खात्यात पडून नागरिकांना त्यांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या कामासाठी रक्कम लागणार नसेल, ती रक्कम कमी केल्यास नळजोडणी अंदाजे 7 हजार रुपयामध्ये होवून सर्वसामान्यांना जोडणी घेणे शक्य होईल, असेही नगरसेवक सचिन देशमुख यांनी म्हटले आहे.
अनामत रक्कम कमी करावीः वंचित बहुजन आघाडी
महापालिकेने नळजोडणीसाठी आकारलेली अनामत रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असून त्यामुळे गोरगरीब नागरिक हक्काच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही अनामत रक्कम कमी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली असून यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. महापालिका खासगी कंपनीचे या माध्यमातून भले करीत असल्याचा आरोप ही जिल्हाध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण यांनी केला आहे.