कृषी प्रदर्शनात शेतक-यांची गर्दी, कृषी संजीवनी महोत्सवः 200 स्टॉल्सची उभारणी, अश्व प्रदर्शन लक्षवेधी
परभणी, प्रतिनिधी
(कै.) अॅड.शेषराव भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवात उभारण्यात आलेल्या कृषी विषयक व विविध वस्तुंच्या स्टॉल्स भेटी देण्यासाठी शेतक-यांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी(दि.सात) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महोत्सवाचे आयोजन भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केले आहे. 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या कृषी प्रदर्शनात 10 फेब्रुवारी रोजी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
प्रदर्शनात सुमारे 200 स्टॉल्स उभारण्यात आले आहे. यामध्ये बी-बियाणे, किटकनाशक, रोपविटिका, टॅ्रक्टर, मशागतीचे यंत्र, ठिबक सिंचन, गृहपयोगी वस्तु, सौरउर्जेवरील वस्तु, शासकीय योजनांची माहिती देणारे जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आदीसह महिला बचतगटाच्या स्टॉल्सचा समावेश आहे. शेती उपयोगी स्टॉल्स मधून शेतक-यांना विविध आधुनिक अवजारांची माहिती दिली जात असून विक्री सुध्दा केली जात आहे. गृह उद्योगासाठी असलेल्या पिठ्याच्या गिरण्या, पापड तयार करण्याची मशिन, दालमिल, शेवई मशिनचे देखील स्टॉल्स देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
अश्वप्रदर्शन ठरते आहे लक्षवेधी
राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवात अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 31 अश्वांचा सहभाग आहे. अश्व पाहण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे.